वर्धा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्थानिक बजाज चौक रेल्वे पुलाजवळील श्री सिद्धीविनायक इंटरप्राईजेस नावाचे भंगार दुकान व गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्यांनी तांबा व इतर साहित्यांसह ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार शहर पोलिसात करण्यात आली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत ५ महिलांना अटक केली. ही कारवाई ११ रोजी करण्यात आली.
बजाज चौकातील रेल्वे पुलाजवळ आदित्य नारनोली यांचे श्री सिद्धीविनायक इंटरप्राईजेस नावाचे भंगार दुकान व गोडाऊन आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी भंगार दुकानातील गोडाऊनचे शटर तोडून ५५ हजार ७९४ रुपये किंमतीचा तांबा, कुलर व पंख्याचे मोटारमधील खराब असलेले तांब्याचे तार असा ७० हजार ७९४ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नारनोली यांनी शहर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करीत गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक करीत होते. दरम्यान, ११ रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदिनी मिटकर हिच्या घरी जाऊन चौकशी केली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल मिळून आला. यासंबंधी विचारपूस केली असता तिने व तिच्या इतर ४ महिला साथीदारांनी संगनमत करून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करीत नंदिनी मिटकर (२१), रेखा काळे (२८), भारती ईटकर (२७), साधना केतवास (२१), अर्चना देवकर (२४) सर्व रा. गिट्टीखदान, बोरगाव (मेघे) वर्धा यांना अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, मनोज धात्रक, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, निलीमा उमक, दिनेश बोथकर, महादेव सानप, पवन पन्नासे, गजानन दरणे, रवी पुरोहित, राहुल लुटे, विनोद कापसे यांनी केली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















