मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी अंदाजे ६.३० वाजता, मूल ते चंद्रपूर मार्गावर मौजा गोंडसावरी गावाजवळील बसस्टॉपच्या फलकाजवळ एक भीषण अपघात झाला.
एका अनोळखी इसमास (वय अंदाजे ५५ वर्ष) मुलकडून चंद्रपूरकडे पायदळ जात असताना अज्ञात वाहनाने भरधाव वेगात धडक दिली. धडकेनंतर वाहनचालक वाहन घेऊन चंद्रपूरच्या दिशेने पसार झाला.
अपघातात इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास उपचारार्थ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेवरून पोलीस स्टेशन मूल येथे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गु. र. नं. ४४२/२०२५ कलम १०६(१), २८१ भा.दं.सं. सहकलम १८४, १३४/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास: मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आमले (मूल) व मा. पोलीस निरीक्षक राठोड साहेब (मूल) यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि. तानु रायपूरे व पो. अंमलदार आतीश मेश्राम तपास करीत आहेत.
सदर मृतदेहाचा शवविच्छेदन चंद्रपूर शासकीय रुग्णालयात करण्यात आला आहे.
अनोळखी इसमाचे वर्णन:
वय अंदाजे ५५ वर्ष, अंगात पांढरा शर्ट, सिमेंट रंगाची गुडघ्यापर्यंत फोल्ड केलेली फुलपॅन्ट, डोक्यावरील केस व दाढी-मिश्या पिकलेल्या, बांधा मजबूत, उंची सुमारे ५ फूट ४ इंच.
पोलीसांनी नातेवाईक, परिचित नागरिकांना मृतकाची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले असून, माहिती असल्यास पोलीस स्टेशन मूल येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















