मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील आकापूर–चिमढा रोडवर आज (मंगळवार) रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर थांबण्याऐवजी वाहनासह पलायन केल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळ गाठले. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी मूल येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले.
या प्रकरणी मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















