मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव हा अनेक कारणांचा परिणाम असला, तरी त्यातील सर्वात निर्णायक आणि आत्मघातकी कारण म्हणजे चुकीची उमेदवार निवड होय. योग्य संघटना, सत्ता आणि संसाधने असूनही भाजप अपयशी ठरला, यामागे उमेदवार निवडीतील चुकाच केंद्रस्थानी दिसते.
नगर परिषद निवडणूक ही मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेवर नव्हे, तर उमेदवाराच्या वैयक्तिक ओळख, काम आणि लोकांशी असलेल्या नात्यावर जिंकली जाते. मात्र अनेक प्रभागांत भाजपने लोकांशी थेट संपर्क नसलेले, स्थानिक प्रश्नांपासून दूर असलेले किंवा केवळ गटबाजीच्या आधारावर पुढे आणलेले उमेदवार दिले. परिणामी मतदारांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकला नाही.
उमेदवार निवडीत कार्यकर्त्यांचे मत, स्थानिक अभिप्राय आणि सामाजिक समीकरणे दुर्लक्षित राहिली. “वरून आलेले नाव” ही भावना अनेक ठिकाणी बळावली. याचा परिणाम असा झाला की, काही निष्ठावान कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले, तर काही ठिकाणी निष्क्रिय राहून अप्रत्यक्ष विरोध केला.
याउलट, विरोधकांनी लोकांमध्ये वावरणारे, उपलब्ध राहणारे आणि स्थानिक प्रश्नांशी जोडलेले चेहरे पुढे केले. त्यामुळे निवडणूक पक्षांमध्ये नव्हे, तर उमेदवारांमध्ये झाली—आणि येथेच भाजप मागे पडला.
भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष असताना उमेदवार निवडीत झालेली चूक अधिक महाग ठरते. कारण सत्तेचा रोष आधीच मतदारांच्या मनात असतो; त्यावर जर उमेदवार विश्वासार्ह नसेल, तर पराभव अटळ ठरतो.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















