मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील टोलेवाही रेल्वे क्रॉसिंग ते भगवानपूर रोड दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाजवळील आगडी नाल्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व तस्करी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलला मोठा फटका बसत असून पर्यावरणीय हानीही होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, आगडी नाल्यातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून ती विविध ठिकाणी वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दीर्घकाळापासून सुरू असतानाही संबंधित वनविभाग व महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अवैध रेती उत्खननामुळे नाल्याची नैसर्गिक रचना बिघडण्याची शक्यता असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत आहे. तसेच भूक्षरण आणि पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित विभागांनी तात्काळ संयुक्त कारवाई करून अवैध रेती तस्करी रोखावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















