मूल शहरात गुन्हेगारीत वाढ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत असून त्याचा थेट परिणाम शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर होताना दिसत आहे. हत्या, मारामारी, चोरी यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य रस्त्यांवर बेधडकपणे दुचाकी चालवणारे तरुण हा नवा त्रासदायक प्रकार ठरत आहे. सिग्नल, वाहतूक नियम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विसर पडल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याकडे पोलिस विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात वाहतूकीची प्रभावी अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांवर कारवाई याची तातडीने गरज आहे. अन्यथा शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहील.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















