कुरखेडा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निघृण हत्या केल्याची घटना बुधवार, ३१ डिसेंबर रोजी समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक दिनेश सूर्यभान डोंगरावर (वय ३३, रा. गेवर्धा) व पत्नी रेखा दिनेश डोंगरावर (वय २८) यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. विवाहानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रेखा हिचे विश्वा सांगोळे (वय २५, रा. भरनुली) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
३० डिसेंबर रोजी रात्री दिनेश व रेखा यांच्यात घरीच जोरदार भांडण झाले. त्यानंतर पत्नी रेखाने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने पती दिनेशची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दुचाकीवरून सती नदी पुलाजवळ नेला. तेथील पुलावरून मृतदेह नदीत फेकून देत अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला. घटनास्थळी दुचाकीही पाडून ठेवण्यात आली.
मात्र, मृतदेह नदीपर्यंत नेत असताना ठिकठिकाणी पडलेले रक्ताचे डाग तसेच घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल तपासानंतर हा प्रकार अपघात नसून हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कुरखेडा शहरातील प्रताप वॉर्ड येथे जाऊन आरोपी पत्नी रेखा व तिचा प्रियकर विश्वा यांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे संपूर्ण कुरखेडा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















