अमरावती : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात नांदगावपेठ पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. पोलिसांनी पोर्टिफाईड तांदळाने भरलेला ट्रक पकडत तब्बल २१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या सहकार्याने संयुक्त तपास करण्यात आला. २४० क्विंटल पोर्टिफाईड तांदूळ (किंमत सुमारे ६ लाख रुपये) आणि एमएच-३० बीडी-१५९९ क्रमांकाचा ट्रक (किंमत सुमारे १५ लाख रुपये) असा एकूण २१ लाखांचा माल जप्त करण्यात आला.
वाहनचालक शिवशंकर तायडे आणि राजेश सोनोने (दोघेही रा. अकोला) यांनी हा तांदूळ अमोल महल्ले (रा. भातकुली) यांच्या गोदामातून वडसा (जि. गडचिरोली) येथे नेत असल्याचे सांगितले. त्यांच्या जवळ ‘बालाजी ट्रेडर्स’चे बिल सापडले असून प्राथमिक तपासात हा तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अंतर्गत नांदगावपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, आणि सपोआ कैलास पुंडकर (फ्रेजरपुरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या मोहिमेत निरीक्षक अधिकारी चैताली यादव, राजाभाऊ राऊत, राजीक खान, निलेश साविकार, राजा सय्यद, वैभव तिखीले आणि अमित ढोले यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















