गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर घातलेल्या कायदेशीर बंदीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर अंकुश आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी देसाईगंज येथे अवैधपणे सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीनुसार, ललीत गोपालदास राठी (वय ४१, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) हा देसाईगंज परिसरात आपल्या चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदर्श महाविद्यालयाजवळ सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी ग्रे रंगाची मारुती इको (क्र. MH-35 AW-3395) वाहन तपासले असता, त्यातून मोठ्या प्रमाणात होल्ला हुक्का शिशा तंबाखू व ईगल हुक्का तंबाखू असे लिहिलेली पॅकेट्स मिळून आली. या कारवाईत —
1️⃣ होल्ला हुक्का शिशा तंबाखू (१३० पॅकेट, वजन १००० ग्रॅम) – किंमत ₹१,७२,२५०/-
2️⃣ ईगल हुक्का तंबाखू (१५४ पॅकेट, वजन ४०० ग्रॅम) – किंमत ₹१,३०,९००/-
3️⃣ वाहन किंमत – ₹३,००,०००/-
4️⃣ रोख रक्कम – ₹२,१९,६००/-
अशा प्रकारे एकूण ₹८,२२,७५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी ललीत राठीने सांगितले की, घटनास्थळावरून पळून गेलेला इसम इंद्रकुमार नागदेवे (मालक – राज प्रोव्हिजन्स, वडसा) असून, तंबाखूचा साठा हा रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) याचा असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१८/२०२५ नोंदविण्यात आला असून, संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य आरोपी ललीत राठी याला अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या कारवाईचा तपास सपोनि. प्रेमकुमार दांडेकर (पो.स्टे. देसाईगंज) करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुलराज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. राजु पंचफुलीवार, व चापोअं. दिपक लोणारे यांनी केली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















