नवी दिल्ली / चंद्रपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच दिल्ली दौरा केला असून, या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील तसेच राष्ट्रीय राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. पक्षात त्यांना नव्या जबाबदाऱ्यांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील प्रश्नांसाठी दिल्ली दौरा
अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मुनगंटीवार म्हणाले, “मी दिल्लीला कोणत्याही पदासाठी आलो नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे.” राज्यात काही ठिकाणी वाढत असलेल्या धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत त्यांनी चर्चा केल्याचे सांगितले.
बांबू संशोधन संस्थेचा तिरंगा भेट
या वेळी मुनगंटीवार यांनी अमित शहा यांना चंद्रपूर येथील बांबू संशोधन संस्थेत तयार केलेला तिरंगा ध्वज आणि हस्तनिर्मित डायरी भेट दिली. बांबू मिशन व पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा हा अनोखा परिचय होता. “स्थानिक कारागिरांच्या कौशल्यातून देशभक्तीची भावना जागवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी नमूद केले.
संघटनात बदलांची शक्यता
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील चर्चेत केवळ विकासाच्या विषयांवरच नव्हे तर राज्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या संघटनात फेरबदल होण्याची शक्यता असून, त्यात मुनगंटीवार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
“राजकारणात काही मिळावे म्हणून आलो नाही”
मुनगंटीवार यांनी यावेळी नवनियुक्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेतली. पत्रकारांनी मंत्रिपदाबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी राजकारणात काही मिळावे म्हणून आलो नाही. समाजसेवेच्या भावनेतून राजकारण करतो.”
राजकीय चर्चांना वेगळे वळण
या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात त्यांच्या नव्या भूमिकेबाबत चर्चा रंगल्या असल्या, तरी मुनगंटीवार यांनी स्वतः “मी पदासाठी नाही, तर महाराष्ट्रासाठी आलो आहे” असे सांगून चर्चांना वेगळे वळण दिले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















