चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठवलेल्या अधिकृत यादीतील उमेदवारांना पक्षाचा ‘एबी फॉर्म’ न देता, उमेदवारी आर्थिक देवाणघेवाणीतून विकल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेत केला आहे. हा आरोप किशोर जोरगेवार आणि सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर करण्यात आला.
सुनील डोंगरे, मनोज पोतराजे, माया उईके, विशाल निंबाळकर, बाळू कोतपल्लीवार आणि मुग्धा गायकवाड यांनी आरोप केला की, यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमुख यांच्यासह सुमारे दहा जणांशी आर्थिक व्यवहार करून उमेदवारी देण्यात आली. तसेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या पत्नींसह अलीकडेच (१०–१५ दिवसांपूर्वी) पक्षात आलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यात आल्याने पक्षांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रदेशाध्यक्षांच्या यादीत सुनील डोंगरे, पूजा पोतराजे, अजय सरकार, माया उईके, सत्यम गाणार, शुभांगी दिकोंडवार, मनीष बावणे, कुणाल गुंडावार, पंचशीला चिवंडे, हरीष मंचलवार आणि वंदना भागवत यांची नावे होती. कासनगोट्टूवार यांनी फोनद्वारे “एबी फॉर्म घ्या” असे सांगितले; मात्र काहींना फक्त झेरॉक्स प्रती देण्यात आल्या, तर अनेकांना एबी फॉर्म दिलाच नाही. उमेदवारी न देता एका पत्राद्वारे ‘एबी फॉर्म दिल्याचा’ बनाव केल्याचा आरोपही करण्यात आला.
पत्रपरिषदेत पुढे सांगण्यात आले की, जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशानंतर संघटनेतील वातावरण बिघडले आहे. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या काळात पक्ष शिस्तबद्ध पद्धतीने चालत होता. आता मात्र उमेदवारीसाठी सर्रास आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित आरोपांची तत्काळ चौकशी करून जोरगेवार व कासनगोट्टूवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी असंतुष्ट कार्यकर्त्यांनी केली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















