चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील कोसंबी, मरेगाव, चितेगांव रेतीघाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना पत्र पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मूल शहरातील भाजपाचे उपाध्यक्ष सुरज रमेश मांदाडे यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे ही बाब लक्षात आल्याचे मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. संबंधित भागात शासनाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून, त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. तसेच पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तहसील प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सदर रेतीघाटांची तातडीने तपासणी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच नियमबाह्य उत्खनन त्वरित थांबवावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन नियमानुसार कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















