गडचांदूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर पोलीस स्टेशन हद्दीत IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर सट्टा व्यवसायावर पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी गोपनीय माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की, गडचांदुर येथील माशाअल्लाह बिर्याणी सेंटर समोर काही इसम IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावत आहेत. माहिती मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली.
छाप्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या IPL सामन्यावर www.nice7777.fun या ऑनलाईन बेटिंग आयडीद्वारे सट्टा खेळताना जुबेर रसुल सैयद (वय २२, रा. धुमने ले-आउट, गडचांदुर) याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासात या सट्टा प्रकरणात रोहीत काकडे (रा. गडचांदुर) हा बेटिंग आयडी पुरविण्याचे काम करत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी गडचांदुर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २६१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, तसेच स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे आणि शेखर माथनकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















