सावली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
सावली तालुक्यातील डोनाळा येथील महिलांवर काळाने घाला घातला. लग्नाचे जेवण वाढण्यासाठी (कॅटरिंग कामासाठी)जात असलेल्या महिलांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला असून, या घटनेत ३० महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तात्काळ गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली व तातडीच्या उपचारांचे निर्देश दिले.
*नेमकी घटना काय?*
डोनाळा येथील सुमारे ३० महिला एका टेम्पो वाहनाने सावली तालुक्यातील अंतरगाव येथे भोजन वाढण्याच्या कामासाठी निघाल्या होत्या. मात्र, डोनाळा टर्निंगवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टेम्पोमधील महिला गंभीर जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.
भाजप नेत्यांची तत्परता
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुका महामंत्री तथा सामाजिक नेते सचिनभाऊ तंगडपल्लीवार व युवा नेते जितू सोनटक्के यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
डॉ. अशोक नेते यांची रुग्णालयाला भेट
माहिती मिळताच मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी सर्व कार्यक्रम बाजूला सारून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यावेळी त्यांनी:
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छायाताई उईके यांच्याशी चर्चा करून उपचारांचा आढावा घेतला.
प्रत्येक वार्डात जाऊन जखमी महिलांची वैयक्तिक विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
”कुठल्याही प्रकारची उणीव भासू देऊ नका आणि जखमींना तातडीने दर्जेदार उपचार द्या,” अशा कडक सूचना उपस्थित डॉक्टरांना दिल्या.
यावेळी सामाजिक नेते मनोहरजी कुकडे, सावलीचे ठाणेदार पुल्लुरवार साहेब,भाऊराव कोठारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जखमींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भीषण अपघातामुळे सावली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता आणि प्रशासनाने वेळेत दिलेला प्रतिसाद यामुळे जखमी महिलांना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत झाली आहे. सध्या सर्व महिलांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















