मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीतही काही हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरणे नियमबाह्य असून यामुळे सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे. विशेषतः हॉटेल, ढाबे व खाद्यव्यवसायिकांकडून अशा प्रकारचा गैरवापर सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नियमांनुसार व्यावसायिक वापरासाठी वेगळे (कमर्शियल) गॅस सिलेंडर घेणे बंधनकारक आहे. मात्र, अधिक खर्च टाळण्यासाठी काही व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याची चर्चा आहे.
याबाबत संबंधित प्रशासन अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच महसूल विभाग यांनी तात्काळ तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा गॅस टंचाईचा फटका सामान्य जनतेलाच बसत राहणार आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















