भामरागड (गडचिरोली) : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
भामरागड तालुका मुख्यालयापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत बुधवारी (ता. २८) सकाळी विद्यार्थ्यांना जेवणानंतर विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत ७० हून अधिक विद्यार्थी अचानक आजारी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असून मोठ्या संख्येने विद्यार्थी वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर सुमारे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास प्रार्थना व परिपाठ सुरू असताना एका विद्यार्थ्याला अचानक उलटी होऊ लागली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच संबंधित विद्यार्थ्याला तात्काळ लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र काही वेळातच इतर विद्यार्थ्यांनाही उलट्या, पोटदुखी व चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर एकामागोमाग एक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडू लागल्याने एकूण ७० हून अधिक विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
परिस्थिती आटोक्यात न आल्याने सर्व आजारी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बारकाईने लक्ष आहे.
दरम्यान, भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी व १० विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क झाले असून आश्रमशाळेत दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विषबाधा नेमकी कोणत्या खाद्यपदार्थातून झाली, याचा शोध घेण्यासाठी अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















