मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल तालुक्यातील मरेगाव बसस्थानकासमोर असलेल्या स्पीड ब्रेकरमुळे गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर स्पष्ट दिसत नसल्याने दुचाकीस्वार अचानक त्यावर चढून वाहन अनियंत्रित होत होते आणि लहानमोठे अपघातही घडत होते.
ही गंभीर बाब लक्षात येताच मरेगाव येथील पोलीस पाटील पुंडलिक जवादे आणि सामाजिक कार्यकर्ते राजु कटारे यांनी प्रशासनाची वाट न पाहता पुढाकार घेतला आणि स्वखर्चाने त्या स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाने लाईन मारून त्याला स्पष्टपणे दिसेल असे स्वरूप दिले.
त्यांच्या या उपक्रमामुळे आता वाहनचालकांना स्पीड ब्रेकर दूरूनच स्पष्टपणे दिसत असल्याने अपघाताची शक्यता कमी झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले असून, “लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने करायचे काम गावकऱ्यांनी स्वतः करून दाखवले” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले जात आहे.
दरम्यान, अनेकांनी अशा प्रकारचे प्रयत्न इतर ठिकाणीही व्हावेत, जेणेकरून जीवितहानी टाळता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















