नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
विदर्भातील नामवंत न्यूरोसर्जन तथा धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे आज (दि. ३१) सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने संपूर्ण वैद्यकीय विश्वात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ५ वाजता त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. तत्काळ उपचारासाठी डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि सकाळी ८ वाजता त्यांचे निधन झाले.
डॉ. पाखमोडे हे राज्यातील आघाडीच्या शल्यचिकित्सकांपैकी एक मानले जात. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी रुग्णसेवा केली. अत्यंत शांत, संयमी स्वभाव, रुग्णांशी आपुलकीने संवाद आणि कठीण प्रसंगातही धीर देण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते.
या दुःखद घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “एक अभ्यासू, तज्ज्ञ आणि रुग्णांविषयी कळवळा असलेला संवेदनशील डॉक्टर आपण गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. याशिवाय वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. पाखमोडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. पाखमोडे यांच्या अकाली निधनाने विदर्भाच्या वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असून, त्यांच्या आठवणी रुग्ण व सहकाऱ्यांच्या मनात कायम राहतील.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















