छत्तीसगड सीमेलगत सुरक्षा बळकट; जनजागरण मेळाव्यात साहित्य वाटप
गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील तुमरकोठी येथे गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या नव्या पोलिस ठाण्याचे उद्घाटन आज अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या हस्ते करण्यात आले. सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पोलिस ठाणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, केंद्रीय राखीव दलाच्या १९१ बटालियनचे कमांडंट सत्यप्रकाश यांच्यासह वरिष्ठ पोलिस व सीआरपीएफ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकातील सुमारे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या २१ चमू, शेकडो नवनियुक्त पोलिस कर्मचारी, सुमारे ५०० पोलिस अधिकारी तसेच खासगी कंत्राटदारांच्या मदतीने हे पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे.
तुमरकोठी पोलिस ठाणे हे कोठी पोलिस ठाण्यापासून ७ किलोमीटर तर छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असून, नक्षल हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे ठाणे मोलाचे ठरणार आहे.
उद्घाटनानंतर आयोजित करण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात स्थानिक महिला व पुरुषांना कपडे, शेतीसाठी आवश्यक साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व क्रीडा साहित्य वितरित करण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड सीमावर्ती भागात एकूण ९ नवी पोलिस ठाणे स्थापन केली असून, यामुळे या दुर्गम व संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्थेला नवी बळकटी मिळाली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















