मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ डॉक्टरांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असून त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मंगळवारी (7 ऑक्टोबर) रूग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे यांच्याशी चर्चा केली असता, सर्जन, भुलतज्ञ, फिजीशियन, दंत शल्यचिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ञ अशा अनेक पदांवर डॉक्टरांची कमतरता असल्याचे समोर आले.
विशेष म्हणजे, सध्या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रतिनियुक्त अधिकारी कार्यरत असले तरी, गेल्या दीड वर्षात एकही सिझर शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे प्रसूतीसंबंधी शस्त्रक्रियांसाठी डॉ. मनिषा शेंडे यांना बाहेरून बोलावावे लागते. या पार्श्वभूमीवर “अशा प्रतिनियुक्तीचा फायदा काय?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आणि त्या ठिकाणी सक्षम स्त्रीरोग तज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली.
या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली. तसेच या संदर्भात आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
मूल तालुक्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव गायकवाड यांच्या पुढाकाराने सन 2005 मध्ये 50 खाटांचे श्रेणीवर्धित उपजिल्हा रूग्णालय स्थापन करण्यात आले. सुरुवातीला तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णसेवा समाधानकारक पद्धतीने सुरू होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर केले जात आहे.
या भेटीदरम्यान मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, माजी सभापती महेंद्र करकाडे, बाबा अझिम, विवेक मुत्यलवार, लोकनाथ नर्मलवार, विपीन भालेराव, आणि संतोष ठाकुरवार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















