मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मुल शहराच्या मध्यवर्ती भागात, नवभारत विद्यालयाजवळ धोकादायक पद्धतीने फटाक्यांचे गोडाऊन उभारण्यात आले असून, या गोडाऊनमुळे शाळकरी मुलांसह परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हे गोडाऊन शाळा व दाट वस्तीजवळ असूनदेखील प्रशासन व पोलीस विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे आरोप होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री याच मार्गाने गेले तरीही सुरक्षा यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने या धोकादायक गोडाऊनकडे लक्ष दिले नाही. दिवाळीच्या काळात नगर परिषद चिल्लर विक्रेत्यांना तलावाच्या काठावर दुकाने लावण्यास भाग पाडते; मात्र थोक विक्रीचा परवाना असलेला हा धनाढ्य व्यापारी वर्षभर चिल्लर विक्री करून नियमांची सरळसरळ पायमल्ली करतो.
काही दिवसांपूर्वी मुल MIDC परिसरातील गॅस गोडाऊनमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने शहर हादरले होते. तरीदेखील स्थानिक प्रशासनाने धडा घेतलेला दिसत नाही. नागरिक विचारत आहेत की, “मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”
या प्रकरणी नगर परिषद व पोलीस विभाग तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















