मुंबई : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः मूल, सावली आणि ब्रम्हपुरी तालुक्यांमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारी मानवहानी थांबविण्यासाठी राज्याचे वनमंत्री मा. नाम. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.४५ वाजता उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत माजी मंत्री शोभाताई फडणविस यांच्यासह वन विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या वाघसंख्येमुळे निर्माण झालेली भीती, वाघांच्या हल्ल्यांमुळे होणारे मृत्यू आणि त्यावर उपाययोजना यासंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
माजी मंत्री शोभाताई फडणविस यांनी पूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच, ८ ते ९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय वाईल्डकॉन परिषदेत त्यांनी काही ठोस सूचना मांडल्या होत्या. त्या सूचनांवर सविस्तर चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यासाठी त्यांनी वनमंत्र्यांकडे बैठक घेण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती.
या बैठकीस अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख व वन्यजीव), मुख्य वनसंरक्षक (प्रा.) चंद्रपूर व ठाणे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक, तसेच वन्यजीव कल्याण संघटनेचे श्री. अनिकेत कदम आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वाघ–मानव संघर्ष नियंत्रणासाठी ठोस योजना, आदिवासी भागातील जनतेचे संरक्षण, आणि वन्यजीव संवर्धनाच्या प्रकल्पांना निधीविषयक निर्णय घेण्यात येण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















