मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अरमान बिरजिस शेख व मोनू बिरजिस शेख (दोन्ही रा. वार्ड क्र. १७, मूल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपाचे मूल शहर अध्यक्ष प्रविण नामदेव मोहुर्ले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिकेच्या सार्वजनिक बोअरवेलवरील सबमर्सिबल पंप लावून अनधिकृतरीत्या पाइपलाईन जोडून आरोपींनी स्वतःच्या घरात पाणीपुरवठा सुरू केला. यावेळी पाइपलाईन टाकण्यासाठी नगरपालिकेचा सिमेंट रस्ता तोडण्यात आला.
या बेकायदेशीर प्रकाराला परिसरातील नागरिकांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना धमकावल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. हा प्रकार शासकीय मालमत्तेची जाणीवपूर्वक तोडफोड करणारा व सामाजिक शांतता बिघडवणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अरमान बिरजिस शेख व मोनू बिरजिस शेख यांच्याविरोधात तात्काळ FIR दाखल करून नगरपरिषद नियमांनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















