चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता निर्णायक वळण मिळताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आक्रमक राजकीय खेळी करत दहा नगरसेवक आपल्या बाजूने जमवण्यात यश मिळवले आहे. या घडामोडींमुळे महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करत एकूण आठ नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये शिवसेनेचे सहा तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवकांचा समावेश होता. हे आठ नगरसेवक अधिकृत गट म्हणून कार्यरत असतानाच आता काँग्रेसच्या दोन बंडखोर नगरसेवकांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
या नव्या प्रवेशामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांची संख्या दहावर पोहोचली असून, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका मध्ये सत्ता स्थापनेसाठी ठाकरे गटाची भूमिका ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या हालचालींमुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुढील काही दिवसांत आणखी राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी असून, दुसरीकडे काँग्रेसकडून बंडखोर नगरसेवकांवर कारवाई होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सत्ता स्थापनेसाठी कोणता पक्ष किंवा आघाडी पुढे येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















