मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल शहरातील वार्ड क्रमांक १७ मध्ये शासकीय मालमत्तेची तोडफोड करून सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात आता अनधिकृत पाणी जोडणी करणाऱ्या प्लंबरची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. या प्रकरणात नगरपरिषदेने मुख्य आरोपी अरमान बिरजिस शेख व मोनू बिरजिस शेख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, पुढील तपासात प्लंबरवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नगरपरिषदेच्या प्राथमिक पाहणीत सार्वजनिक बोअरवेलवरील सबमर्सिबल पंपावरून अनधिकृतरीत्या पाइपलाईन जोडण्यात आल्याचे तसेच यासाठी नगरपालिकेचा सिमेंट रस्ता तोडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामे तांत्रिक स्वरूपाची असल्याने, ती प्लंबरच्या मदतीशिवाय होणे शक्य नाही, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून सादर होणाऱ्या खुलाशानंतर या कामासाठी नेमका कोणता प्लंबर वापरण्यात आला, त्याने नगरपरिषदेची परवानगी घेतली होती का, तसेच त्याला सार्वजनिक मालमत्ता असल्याची जाणीव असूनही काम केले का, याची चौकशी केली जाणार आहे. तपासात दोषी आढळल्यास संबंधित प्लंबरवर दंडात्मक कारवाई, कामावर बंदी (ब्लॅकलिस्ट) तसेच नुकसानभरपाईची वसुली केली जाऊ शकते.
दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे मूल शहर अध्यक्ष प्रविण नामदेव मोहुर्ले यांनी निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच या प्रकाराची माहिती मूल पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनाही देण्यात आली होती.
मूल नगर परिषदेच्या कारवाईमुळे शहरात समाधान व्यक्त होत असून, आता मुख्य आरोपींसह प्लंबरवरही कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















