नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नागपूरच्या फेटरी परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये प्रेमसंबंधातून उफाळलेल्या वादाचे भीषण पर्यवसान झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खासगी खोलीत झालेल्या तीव्र भांडणानंतर तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने नागपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत रुचिता भांगे (वय अंदाजे 22) हिचा मृत्यू झाला असून, सौरव जामगडे असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे काल सायंकाळच्या सुमारास नागपूर ग्रामीण हद्दीतील फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये थांबले होते. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
घटनेच्या रात्री हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये जोरदार भांडण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच वादातून सौरवने रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास चाकूने हल्ला करत रुचिताचा गळा कापून तिची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपीने तात्काळ हॉटेलमधून पळ काढल्याचेही समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
या घटनेमुळे प्रेमसंबंधातील वाढती हिंसा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, तरुण पिढीतील नातेसंबंधांमधील तणाव आणि असहिष्णुतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















