मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 जानेवारी 2026 पासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, त्याला मूल पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
मूल पंचायत समितीमध्ये कार्यरत MIS समन्वयक, कार्यक्रम व्यवस्थापक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पॅनल तांत्रिक अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून शांततामय निषेध व्यक्त केला. तसेच संघटनेच्या आवाहनानुसार मनरेगा अंतर्गत शंभर टक्के MIS कामबंद ठेवण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन व संबंधित विभागांना वेळोवेळी निवेदने, आंदोलन नोटिसा व स्मरणपत्रे देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
हे आंदोलन पूर्णतः शांततामय असूनही निर्णायक स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात आले. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय अडचणींसाठी शासन जबाबदार राहील, असेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या आंदोलनामुळे आगामी काळात मूल तालुक्यातील मनरेगा MIS कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, शासन या मागण्यांवर कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















