मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगरपरिषद येथे बहुप्रतिक्षित विषय समित्यांच्या सभापतीपदाचा निर्णय अखेर जाहीर झाला असून, एकूण सहा नगरसेवकांना विविध समित्यांचे सभापतीपद निर्विरोध मिळाले आहे. या घोषणेमुळे नगरपरिषदेत समाधानाचे वातावरण असून, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
घोषित नियुक्त्यांनुसार प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक तसेच उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतीपद सोपविण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक प्रशांत समर्थ यांची बांधकाम विभागाच्या सभापतीपदी निवड झाली आहे.
प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक विलास कागदेलवार यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे सभापतीपद, तर याच प्रभागातील नगरसेविका लीना फुलझेले यांची शिक्षण विभागाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका नलिनी आडपवार यांच्यावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका समीक्षा कडस्कर यांची महिला व बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी काम पाहिले. त्यांनी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने नगराध्यक्ष पदासह २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. नगराध्यक्षपदी एकता प्रशांत समर्थ यांनी दणदणीत विजय मिळवला असून, राकेश रत्नावार यांची गटनेता व उपाध्यक्षपदी निवड झाली होती. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून गुलाब खान पठाण व बंडू गुरुनुले यांची निवड करण्यात आली आहे.
सभापतीपदांची घोषणा होताच संबंधित पदाधिकारी व नगरसेवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. नव्या टीमकडून मूल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















