मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मूल नगरपरिषदेच्या सत्ताकारणात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, काँग्रेसचे आक्रमक युवा नेतृत्व राकेश यादवराव रत्नावार यांची पाचव्यांदा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेत काँग्रेसचा दबदबा अधिक भक्कम झाला असून, विरोधी गटांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नगरपरिषद मूल येथे काँग्रेस गटनेतेपदी निवड झाल्यानंतर लगेचच उपाध्यक्षपदावर बिनविरोध निवड होणे, हे राकेश रत्नावार यांच्या वाढत्या राजकीय ताकदीचे स्पष्ट संकेत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. अल्पवयात राजकारणात प्रवेश करून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन करणारे रत्नावार आज मूलच्या राजकारणातील प्रभावी आणि निर्णायक चेहरा बनले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशस्तरीय नेते संतोषसिंह रावत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले रत्नावार हे संघटनात्मक ताकद, आक्रमक निर्णयक्षमता आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात. कृषी उत्पन्न बाजार समिती, मूलच्या सभापतीपदावर ते दुसऱ्यांदा विराजमान असून, शेतकरी हिताचे धाडसी निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागात त्यांची मजबूत पकड निर्माण झाली आहे.
अलीकडील नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह तब्बल १८ नगरसेवक निवडून आणत विरोधकांचे गणित पूर्णपणे बिघडवले. या पार्श्वभूमीवर राकेश रत्नावार यांची उपाध्यक्षपदी निवड म्हणजे काँग्रेसच्या सत्तास्थैर्यावर उमटलेला ठोस शिक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर, माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मूलच्या नगराध्यक्षा एकता समर्थ व सर्व नगरसेवकांच्या सहकार्यातून मूल शहराच्या विकासासाठी आक्रमक धोरण राबवणार, असा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीमुळे येत्या काळात मूल नगरपरिषदेत विकासकामांना वेग येणार असून, त्याचबरोबर स्थानिक राजकारणातील रणधुमाळी अधिक तीव्र होण्याचे स्पष्ट संकेतही मिळत आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















