कुरखेडा : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी ग्रामपंचायतीत माजी ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर सुमारे २५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा गंभीर आरोप असूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी १०३ सह्या असलेले निवेदन गट विकास अधिकारी धीरज पाटील यांना सादर केले होते. त्या वेळी तत्काळ चौकशी करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही चौकशी, निलंबन किंवा गुन्हा दाखल करण्याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
ग्रामस्थांच्या वतीने १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा गट विकास अधिकारी धीरज पाटील यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे. या पत्रात माजी ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर तत्काळ निलंबन व फौजदारी गुन्हा दाखल करणे, १५ दिवसांत विशेष ऑडिट पूर्ण करून त्याचा अहवाल ग्रामसभेपुढे सादर करणे, तसेच अपहाराची संपूर्ण रक्कम ग्रामपंचायत खात्यात परत जमा करून घेणे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ग्रामसभेत दोन वेळा ठराव होऊनही आजपर्यंत हिशोब सादर करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावाच्या विकासासाठी आलेला निधी अपहाराच्या माध्यमातून वाया गेला आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने मागण्या मांडत आहोत, मात्र अन्याय सहन करणार नाही आणि मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या आंदोलनाला गावातील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. पत्राद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर १६ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरील तिन्ही मागण्या लेखी स्वरूपात मान्य करून आदेश निर्गमित करण्यात आले नाहीत, तर बेमुदत उपोषण अनिवार्यपणे सुरू होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार
















