मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती सोहळा उत्साहात साजरा होणार आहे.
मूल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूल यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती सोहळा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा जयंती सोहळा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर रोड, मूल येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या जयंती सोहळ्याची सुरुवात सकाळी ८.३० ते ९.०० वाजेपर्यंत बेलदार समाज भवन, मूल येथे पुष्पमालार्पणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० ते १०.१५ वाजेपर्यंत समाज भवन ते मा. सा. कन्नमवार सभागृहापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता मा. सा. कन्नमवार सभागृह येथे प्रतिमेस पुष्पमालार्पण करण्यात येईल. सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत मुख्य कार्यक्रम होणार असून दीपप्रज्वलन, मान्यवरांचे मार्गदर्शन, पाहुण्यांचे स्वागत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडणार आहे.
या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रा. विवेकजी गोर्लावार, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संजयजी मूत्यालवार, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चिमूर हे राहणार आहेत.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विजयाराव जिडजीलवार, सहाय्यक जिल्हा विकास अधिकारी, पंचायत समिती, भद्रावती, मा. श्री. कुणालजी येनगंधेलवार, उपकार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, चंद्रपूर, मा. डॉ. मनोहरराव ग. मुद्देशवार, माजी डीन, मेडिकल कॉलेज, नागपूर तसेच मा. श्री. सुनीलजी कारडवार, तालुका कृषी अधिकारी, मूल हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मा. श्री. पांडुरंगजी गुज्जनवार व बंधू तसेच मा. डॉ. सुभाष रेड्डीवार, माजी अध्यक्ष, बेलदार समाज संघटना, मूल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारी ३.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व नाटिका स्पर्धा आयोजित करण्यात आली असून एकल नृत्य, समूह नृत्य व खुली नाटिका स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सायंकाळी ५.०० ते ५.३० वाजेपर्यंत बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम होईल. समारोपानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत रांगोळी स्पर्धा तसेच शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत बेलदार समाज भवन, सोमनाथ रोड, मूल येथे वाण वाटप व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. मा. सा. कन्नमवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रामाणिक, मूल्याधिष्ठित आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा जयंती सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या मंगल प्रसंगी सर्व समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मूल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी केले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















