मूल : रवी बरडे (तालुका प्रतिनिधी)
मूल नगर परिषदेची निवडणूक जवळ येत असताना शहरातील मतदारांमध्ये योग्य उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा रंगू लागली आहे. पाच वर्षांसाठी आपल्या प्रभागाचा विकास, सुविधा आणि हक्काचे प्रतिनिधित्व कोण करणार याचा निर्णय घेताना मतदारांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे.
सर्वप्रथम, उमेदवाराचा चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची वृत्ती याकडे मतदारांनी लक्ष द्यावे, अशी नागरिकांमध्ये भावना आहे. गेल्या काळात कोणत्या उमेदवाराने खरोखरच लोकांसाठी काम केले, कोण कष्टाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून गेला, याचे आकलन करणे गरजेचे असल्याचे नागरिक सांगतात.
दुसरे म्हणजे, विकासकामांची दूरदृष्टी आणि प्रभागाच्या उर्वरित समस्या सोडविण्याची क्षमता अत्यंत महत्वाची आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नालीसफाई, स्ट्रीट लाईट, आरोग्य सुविधा अशा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी उमेदवार किती सक्षम आहे, याचा विचार मतदार करताना दिसत आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उमेदवाराची उपलब्धता आणि साधेपणा. निवडणूक येते तेव्हाच नव्हे तर संपूर्ण कार्यकाळात नागरिकांमध्ये राहून प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी हवा, अशी मतदारांची भूमिका आहे.
तसेच, मतदारांमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा काम करणारा उमेदवार महत्त्वाचा या विचाराला अधिकाधिक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसलेल्या वाऱ्यापेक्षा आता लोक काम, विकास आणि पारदर्शक नेतृत्वाला प्राधान्य देऊ लागले आहेत.
मूल शहराचा पुढील पाच वर्षांचा चेहरा बदलण्याची क्षमता मतदारांच्या योग्य निर्णयात दडलेली असल्याने, सर्व मतदारांनी विचारपूर्वक, दबावमुक्त आणि जागृत मतदान करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















