गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली शहरातील बी-फॅशन प्लाझा समोर आज बुधवारी (दि. 10) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात स्कूटी घसरून मालवाहतूक ट्रकच्या चाकाखाली आल्याने एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव ममता धर्माजी बांबोळे (वय ४२ वर्षे, रा. पोर्ला, ता. गडचिरोली) असे असून त्या गडचिरोली येथील कार्मेल हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रोजच्या प्रमाणे त्या शाळेत जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मागे सरकणाऱ्या मालवाहू ट्रकच्या मागे असताना ममता बांबोळे यांची स्कूटी अचानक स्लीप झाली. त्यामुळे त्या वाहनासह ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
ममता बांबोळे यांच्या निधनाने शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















