गडचिरोली : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
मानवी हक्क दिनाच्या दिवशी गडचिरोलीत अशी घटना घडली ज्याने मानवतेचा खरा अर्थ जगासमोर ठेवला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय बेवारस चमेलीबाई आनंदराव कोरम (रहिवासी- चंद्रपूर, मूळ- छत्तीसगड) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाची जबाबदारी गडचिरोली पोलिसांनी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी स्वखुशीने उचलली.
कसे सुरू झाले हे सगळे?
५ नोव्हेंबर रोजी ही वृद्ध महिला गडचिरोली बसस्थानक परिसरात बेवारस, अशक्त आणि आजारी अवस्थेत आढळली. माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने पुढाकार घेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
तेथे डॉक्टर, परिचारिका आणि इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी तिची मनापासून सेवा आणि काळजी घेतली. मात्र तब्येत अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान ९ डिसेंबर रोजी तिचे निधन झाले.
कोणीच पुढे आलं नाही…
तिच्या चंद्रपूर आणि छत्तीसगडमधील नातेवाईकांना अनेक वेळा संपर्क केला गेला, परंतु कोणीही येण्यास तयार नव्हते.
अगदी वृद्धाश्रम आणि समाजसेवी संस्थांनी सुद्धा तिला स्वीकारण्यास नकार दिला होता.
आणि मग माणुसकी पुढे आली…
अखेर कुणीच नसताना, गडचिरोली पोलिसांनी तिचा अंतिम संस्कार सन्मानपूर्वक करण्याची जबाबदारी स्वीकारली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी पुढाकार घेतला आणि तिच्या अंत्ययात्रेला खांदा देत श्रद्धांजली वाहिली.
मानवतेचा खरा अर्थ
नातेवाईक नसले तरी कर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेने गडचिरोली पोलिसांनी दाखविलेली ही संवेदनशीलता
मानवाधिकार दिनाचा खरा अर्थ अधोरेखित करणारी क्षणचित्र ठरली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















