गडचिरोली : (जिल्हा प्रतिनिधी)
भारतभरातील लाखो अनुयायी, विचारवंत आणि तरुण वर्ग 6 डिसेंबरला महानायक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धा, शिस्त आणि आदराने साजरा करतात. देशाच्या सामाजिक क्रांतीला दिशा देणाऱ्या या महापुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण राज्यात वातावरण भाविकतेने भारून जाते.
या पवित्र दिवशी गालबोट लागू नये, कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाचा पवित्रपणा अबाधित राहावा, यासाठी महाराष्ट्रभर एक दिवस सर्व वाइन शॉप, बार आणि मद्यविक्री केंद्र पूर्णपणे बंद ठेवावेत, अशी मागणी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघ, भीम अनुयायी आणि अनेक मान्यवरांनी जोरदारपणे केली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मुंबईच्या चैत्यभूमीवर दाखल होतात, राज्यातील विविध ठिकाणी महाप्रार्थना, व्याख्याने आणि संविधान वाचनाचे कार्यक्रम होतात. अशा वेळी मद्यपानामुळे होणारी गर्दी, भांडणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना टाळण्यासाठी सरकारने सक्तीचे आदेश लागू करावेत, असा ठाम आवाज समाजातून उठू लागला आहे.
“महापरिनिर्वाण दिन हा आदराचा दिवस; मनोरंजनाचा नाही. त्या दिवशी वाइन शॉप–बार बंद ठेवले तर ते बाबासाहेबांप्रती खरी कृतज्ञता ठरेल,” असे मत विविध संघटनांनी नोंदवले आहे.
राज्य सरकारकडे येत्या काही तासांत या मागणीवर निर्णय घेण्याची जनतेत उत्सुकता वाढली आहे. भाविकांची एकच अपेक्षा —
“६ डिसेंबरला शिस्त, संयम आणि आदराची मर्यादा राखा; बाबासाहेबांच्या दिवसाला गालबोट लागू देऊ नका.”

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















