नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, तसेच चौकशी सुरू असल्याने त्यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी १३ डिसेंबर रोजी विधानसभेत दिले.
ही माहिती काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीबाबत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर दिली.
लक्षवेधीदरम्यान बोलताना विजय वडेट्टीवार यांनी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी सांगितले की, जाधव हे अत्यंत नियमबाह्य आणि संशयास्पद पद्धतीने काम करत असून, रात्रीच्या गस्ती दरम्यान वाळूने भरलेला ट्रक तब्बल दहा दिवस ताब्यात ठेवण्यात आला. मात्र ट्रक मालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता तो ट्रक सोडून देण्यात आला.
ब्रह्मपुरी परिसरात वाळू तस्करांचा उच्छाद सुरू असताना संबंधित पोलीस अधिकारी ‘माझे कुणी वाकडे करू शकत नाही’ अशा आवेशात वागत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेत लावून धरली.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश न दिल्याने विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या मोकळ्या जागेत जाऊन जोरदार आंदोलन करत संबंधित पोलीस उपअधीक्षकाच्या निलंबनाची मागणी केली. अखेर गृहराज्यमंत्र्यांनी चौकशी सुरू असल्याचे मान्य करत आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध वाळू तस्करी आणि पोलीस प्रशासनातील कथित संगनमत पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, आगामी काळात सरकार कोणती ठोस कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार
















