कॉंग्रेसचा वचननामा जाहीर; ‘परतावा नव्हे, पारदर्शकता हवी’ – वडेट्टीवार
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
“संविधानावर आधारित लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे. धमक्या देऊन, मत चोरून किंवा पैशांची पाकिटे वाटून लोकशाही टिकत नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संयम राखत, समन्वय आणि शिस्तीतून प्रचार करावा,” असा स्पष्ट संदेश माजी मंत्री आणि आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिला.
नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी होत असताना कॉंग्रेस पक्षाच्या वचननामा प्रकाशन कार्यक्रमात ते स्थानिक कॉंग्रेस भवन येथे बोलत होते.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत
“रामलीला भवनसमोर झालेल्या विरोधकांच्या सभेतले भाषण म्हणजे पराभवाची भीती आणि पदाचा दुरुपयोग आहे. यावर योग्य वेळी उत्तर दिले जाईल,” असा इशारा दिला.
प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी भाषणात सांगितले की,
“कॉंग्रेसमध्ये आता एकतेचा विचार दृढ होत असून सर्व कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता समर्थ यांच्या विजयासाठी झटत आहेत,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात सर्व उमेदवारांनी उपस्थितांसमोर आपला परिचय करून दिला.
शहराध्यक्ष सुनील शेरकी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले, तर तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष विजय चिमद्यालवार, राकेश रत्नावार, प्रशांत समर्थ, राजेंद्र कन्नमवार, घनश्याम येनुरकर, प्रा. किसन वासाडे, रुपाली संतोषवार, बाबा अजीम, संदीप कारमवार, किशोर घडसे, पवन नीलमवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















