आरमोरी : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
आरमोरी तालुक्यातील देऊळगाव-इंजेवारी परिसरात अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने ‘ऑपरेशन लेपर्ड’ अंतर्गत जेरबंद केले. ११ डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांत या बिबट्याने दोन महिलांचा बळी घेतल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले होते. शेतात जाणे, रात्री बाहेर पडणेही धोकादायक झाले होते. वाढत्या हल्ल्यांच्या पाश्वभूमीवर संतप्त नागरिकांनी काही दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनही केले होते.
नागरिकांच्या वाढत्या चिंतेची दखल घेत वनविभागाने तातडीने शोधमोहिम राबवली. जलद प्रतिसाद पथक तसेच स्थानिक वनकर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून परिसरात पाळत वाढवण्यात आली. जंगलातील विविध ठिकाणी सापळे उभारण्यात आले होते. अखेर मध्यरात्री उभारलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आणि ‘ऑपरेशन लेपर्ड’ यशस्वी ठरले.
बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांमधील भीतीचा माहोल कमी झाला असून वनविभागाच्या तात्काळ व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. वनविभागाच्याही या धाडसी मोहिमेमुळे देऊळगाव-इंजेवारी परिसरात पुन्हा सामान्य स्थिती परतताना दिसत आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार
















