मुनगंटीवारांच्या उपस्थितीत संदीप मोहबे यांचा भाजप प्रवेश
प्रभाग १० मध्ये भाजपची ताकद वाढली : संदीप मोहबेचे आगमन
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग १० मध्ये आज मोठी राजकीय हालचाल घडली. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रभाग १० चे इच्छुक उमेदवार संदीप मोहबे यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
काँग्रेसकडून उमेदवारीचे आश्वासन मिळूनही, शेवटच्या क्षणी बाहेरून ‘आयात उमेदवार’ आणून स्वतःला डावलण्यात आल्याचे मोहबे यांनी स्पष्टपणे सांगितले. या निर्णयामुळे नाराज झालेल्या मोहबे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत थेट भाजपचा झेंडा हाती घेतला.
संदीप मोहबे हे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या निष्ठा, कार्यतत्परता आणि प्रभागातील जनाधारामुळे त्यांची ओळख मजबूत होती.
भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग १० मधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की,
“संदीप मोहबे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग १० मध्ये भाजपचा विजय जवळजवळ निश्चित झाला असून याचा थेट लाभ नगराध्यक्ष निवडणुकीलाही मिळणार आहे.”
मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश भाजपसाठी मोठा बुस्टर ठरत असून प्रभागातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार


















