नागपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये खरीप २०२५ मधील अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा शासन निर्णय मंगळवारी (ता.९) जारी केला आहे. शासन निर्णयानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य सरकारने जुन्या दर आणि निकषाने मदत देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात अवकाळीचा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामध्ये शेती पिकांचं अतोनत नुकसान झाले आहे. त्यासाठी महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ८८ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमानुसार गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ३६ हजार ६५० शेतकऱ्यांना मदत वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये गडचिरोलीतील ७२ हजार १३४ तर चंद्रपूरमध्ये ६४ हजार ५१६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ५० हजार ८९० हेक्टर क्षेत्रासाठी ५६ कोटी ६८ लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३७ हजार २४७ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३१ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य सरकार मदतीचं वाटप दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देणार आहे. मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच हंगामात याआधी दिलेल्या मदतीत पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार



















